Posts filed under '1'
तिच्या माझ्या ओळी… १
१.
तिच्या डोळ्यांत पाहिलं की
कुणास ठाऊक काय घडतं..
एका कुरुप वेड्या बदकाच्या पिलाला
तो राजहंस असल्याचं स्वप्न पडतं…
______________________
२.
जाता जाता सहज विचारलं तिनं,
‘तुला माझी आठवण येईल का?’
म्हणालो, ‘ नाही, …
आठवण्यासाठी आधी विसरावं लागतं’..
______________________
३.
ही जादू कोणती होते..
जेव्हा तुझा स्पर्श होतो..
माझ्या वेदनांनाही तेव्हा
केवढा हर्ष होतो..
______________________
४.
माझं लिहिणं..
शब्दांचा फोल पसारा..
निरर्थक.. कधी व्यर्थ असतो…
तुझं लिहिणं…
भावगर्भ..
को-या ओळींनाही किती अर्थ असतो..
______________________
1 comment October 29, 2007
स्वप्ने…
का तुला पाहताना उमलतात स्वप्ने काही..?
मृदुल हळवी तरी का सलतात स्वप्ने का ही..?
क्षणाक्षणाने छळते रात ही अशीच मजला…
अंधारगूज जेव्हा उकलतात स्वप्ने काही…
सुने भकास जरी हे आकाश माझ्या मनाचे,
अलवार चांदण्यांची फुलतात स्वप्ने काही…
ही जादू तुझ्या स्वरांची भारते रान सारे,
वाट माझ्या पावलांची बदलतात स्वप्ने काही…
Add comment October 9, 2007
कथा
माझ्या मनाची व्यथा काय सांगू..?
आसवांत भिजली कथा काय सांगू..?
कळेना मला मी कुठे वाट चुकलो..
कुठे सोडला मी जथा काय सांगू..?
लाख सांगुनी जे तुलाही न कळले,
गूज या मनाचे वृथा काय सांगू..?
मिठीत घेऊनी जी तरूलाच गिळते..
किती ही विषारी लता काय सांगू..?
देह साजणीचा हा वेष काफिराचा,
फसलो पुरा मी आता काय सांगू..?
1 comment October 1, 2007