शब्दगर्भ…

कधी कधी वाटतं..
तुला नि मला सोबतच राहावा गर्भ…
तू बाळाला जन्म द्यावास…
… अन मी कवितेला..

तान्हुल्याचं हसू
जेवढं निरागस… निखळ…
तेवढेच आसुही तिचे
असावेत निष्पाप..
आणि इवल्याशा पिलाच्या
टकमक हस-या डोळ्यांनी..
बघावं दोघांनी जगाकडं.

त्याचं गोडगोजिरं अंग तसं
तिच्या शब्दाशब्दाला बाळसं यावं..
दोघांच्या किलबिल कलकलीनं
भरावं घर.. अंगण… आभाळही…
आणि त्याला दुडूदुडू चालताना
सावरावंस तू…
…मला तिला आवरणं कठीण व्हावं…

मग त्याच्या गोलगोब-या गालांचे
मटामटा घ्यावेत मुके..
शब्दांना तिच्या तूही ओठांनी टिपावं.
… त्याचे ओठ तू चुंबताना..
कवितेनं त्याच्या ओठी यावं…

——————————

…. कधीतरी शब्द माझे
सोडतीलच श्वासांना… आणि ओठांनाही..
तेव्हा त्याच्या ओठांनी
माझी कविता गावं..

3 comments सप्टेंबर 22, 2008

तिच्या माझ्या ओळी… १

१.
तिच्या डोळ्यांत पाहिलं की
कुणास ठाऊक काय घडतं..
एका कुरुप वेड्या बदकाच्या पिलाला
तो राजहंस असल्याचं स्वप्न पडतं…
______________________

२.
जाता जाता सहज विचारलं तिनं,
‘तुला माझी आठवण येईल का?’
म्हणालो, ‘ नाही, …
आठवण्यासाठी आधी विसरावं लागतं’..
______________________

३.
ही जादू कोणती होते..
जेव्हा तुझा स्पर्श होतो..
माझ्या वेदनांनाही तेव्हा
केवढा हर्ष होतो..
______________________

४.
माझं लिहिणं..
शब्दांचा फोल पसारा..
निरर्थक.. कधी व्यर्थ असतो…
तुझं लिहिणं…
भावगर्भ..
को-या ओळींनाही किती अर्थ असतो..
______________________

१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 29, 2007

स्वप्ने…

का तुला पाहताना उमलतात स्वप्ने काही..?
मृदुल हळवी तरी का सलतात स्वप्ने का ही..?

क्षणाक्षणाने छळते रात ही अशीच मजला…
अंधारगूज जेव्हा उकलतात स्वप्ने काही…

सुने भकास जरी हे आकाश माझ्या मनाचे,
अलवार चांदण्यांची फुलतात स्वप्ने काही…

ही जादू तुझ्या स्वरांची भारते रान सारे,
वाट माझ्या पावलांची बदलतात स्वप्ने काही…

Add a comment ऑक्टोबर 9, 2007

कथा

माझ्या मनाची व्यथा काय सांगू..?
आसवांत भिजली कथा काय सांगू..?

कळेना मला मी कुठे वाट चुकलो..
कुठे सोडला मी जथा काय सांगू..?

लाख सांगुनी जे तुलाही न कळले,
गूज या मनाचे वृथा काय सांगू..?

मिठीत घेऊनी जी तरूलाच गिळते..
किती ही विषारी लता काय सांगू..?

देह साजणीचा हा वेष काफिराचा,
फसलो पुरा मी आता काय सांगू..?

१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 1, 2007

एक शून्य…

खरंतर..
‘मी’पण विसरुन प्रेम करण्यातच तो फसतो..
आणि असंच समजून बसतो, तिचंही तसंच असावं…

मग कधीतरी ती विचारते अचानक,
‘तुझा काय संबंध..? तू आहेस कोण…?’
त्याला मग काही बोलताच येत नाही..
तो कोण आहे हेच सांगताच येत नाही..

कारण..
तो विसरलेला असतो त्याचं ‘मी’ पण…
मग मागे उरतो कोण…?

एक शून्य… एकटाच..

Add a comment सप्टेंबर 17, 2007

काल रात्री..

काल रात्री,
तो भिकारी चंद्र
आला होता माझ्या अंगणात…
मळक्या चेह-याचा,
नि फाटक्या ढगांची लक्तरं पांघरलेला…

सुर्याला म्हणावं,
सकाळी अंगण नीट झाडून घे…
तारकांचा कचरा फार झालाय अंगणात…

Add a comment सप्टेंबर 7, 2007

मी…अनंत…

ब-याचदा मी लहान मूल होतो..
आणि अवखळ रूईच्या म्हातारी मागं धावत विसरून जावं घरदार…
तसं स्वत:ला विसरून या स्वरांमागे धावत जातो…

या देहाचे उंबरे लंघून … शब्दांची कुंपणं तोडून..
भावभावनांची वेस ओलांडून…मी स्वरांसोबत चालू लागतो..
काही वेळानं ते माझा हात हातात घेतात..
चालता चालता अलगद उचलून कडेवर घेतात..
अन एक अनोखा प्रवास सुरु होतो..

आम्ही अवकाशाचा कप्पा कप्पा व्यापत जातो..
सारे आभास कापत जातो..
सा-या दिशा व्यापून आम्ही दिगंत होतो..

या स्वरांसोबत चालता चालता मी ही अनंत होतो..

Add a comment सप्टेंबर 7, 2007

पाऊस – ३

मनाच्या शिवारी गर्द दाटलेले घन…
आज भरले गगन… आठवांनी ।

मनातून कोंदलेली अनामिक हुरहुर..
एक अस्वस्थ काहूर… या दिशांनी ।

याच पावसाने केले असे जीवघेणे घात..
तुझी सजली वरात… या फुलांनी ।

सनईने गायला ग असा निखा-यांचा राग…
लागे सपनांना आग… त्या स्वरांनी ।

आत सलणारा जरी घाव होता खोल खोल…
दिला निरोप अबोल… नयनांनी ।

तुझ्या अंगणात सुख मेघांपरि बरसावे
असे तुझे घर व्हावे… आबादानी ।

आता एकला पाऊस आता एकले भिजणे..
आणि एकले थिजणे…आठवांनी ।

रानभर वेचतो मी आता तुझ्या खुणा ।
आता येणे नाही पुन्हा… या ठिकाणी ।

१ प्रतिक्रिया जुलै 6, 2007

पाऊस – २

मेघमल्हाराची धून गाती दाटलेले घन…
चिंब भिजले गगन… त्या सुरांनी ।

मनाचे उधाण भिडे आभाळाला थेट..
झाली तिची माझी भेट… आडरानी ।

ओल्या मिठीत मिटली तिने पापण्यांची फुले..
अन ओठांनी टिपले… थेंब पाणी ।

सोनपिवळ्या उन्हाने तिचे माखलेले अंग..
उमटले सप्तरंग … आसमानी ।

काळ्या भुईने चोरला तिच्या केसांचा सुवास…
थेंब मोतियांची रास… पानोपानी ।

तिच्या पैजणांचे ताल धरू लागले मयुर…
झाले अधीर आतुर… गात गाणी ।

तिने मलाच पुसले वेड्या पावसाचे गूज…
केली जादुगरी आज… सांग कोणी ।

तिला हळूच म्हणालो, ‘तुझ्या ओठांशी मल्हार…
अशी खुळी जादुगार… तूच राणी ।

4 comments जुलै 5, 2007

संदर्भ

पाहीले तुझ्या डोळ्यांत जेव्हा…
मी मला सापडाया लागलो ।
तू हासलीस मुग्ध पाहुनी अन …
मी मला आवडाया लागलो ।

मानले की वेदनांना अंत नाही…
तरी त्यांची आता जराही खंत नाही…
स्पर्शता तू घाव ही गंधाळती…
सुगंधात मी बुडाया लागलो ।

एकांती उमलतील संदर्भ माझे..
ओठी तुझ्या हसतील शब्द माझे,
फुलतील देही श्वास माझे तुझ्या ..
हृदयी मी धडधडाया लागलो ।

2 comments डिसेंबर 21, 2006

पृष्ठे

प्रवर्ग

लिंक्स

मेटा

दिनदर्शिका

एप्रिल 2021
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Most Recent Posts